१३ उपग्रहांचे शत्रूंवर लक्ष!
By Admin | Updated: June 27, 2017 00:37 IST2017-06-27T00:37:03+5:302017-06-27T00:37:03+5:30
कार्टोसॅट-2 ई या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विशेषत: लष्करी उद्देशांसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपग्रहांची संख्या

१३ उपग्रहांचे शत्रूंवर लक्ष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कार्टोसॅट-2 ई या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विशेषत: लष्करी उद्देशांसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपग्रहांची संख्या १३ झाली असल्याची माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे. टेहळणी व सीमा भागांतील नकाशांचे रेखांकन करण्याबरोबरच शत्रूच्या जमीन आणि समुद्रातील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे.
लष्करी उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणारे हे उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत स्थिर करण्यात आले आहेत. गेल्या शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेला कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रह ७१२ किलो वजनाचा असून, गरजेनुसार विशिष्ट अशा भागांचे उच्च दर्जांची छायाचित्रे पाठवण्याची क्षमता त्यात आहे. कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रह खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत आहेत.
भारतीय नौदलही विविध भागांमध्ये तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी जीसॅट-7 या उपग्रहाचा वापर करते. भारताकडे आज उपग्रहविरोधी अस्त्र डागण्याची क्षमता आहे, ज्यात शत्रूचा उपग्रह नष्ट करता येतो. आजच्या घडीला अशी क्षमता अमेरिका, रशिया व चीन या देशांकडेच आहे. शक्य असूनही इस्त्रोला सध्या तरी अशा उपग्रहविरोधी तंत्रज्ञानामध्ये पडण्याची इच्छा नाही. इस्त्रो नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते, असे स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले.
इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर पीएसएलव्हीने कार्टोसॅट-२ सह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. या ३१ मध्ये भारताचे दोन व २९ परदेशी उपग्रह आहेत.