उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारावी नापास व्यक्तीने डॉक्टर असल्याचं खोट सांगून बिनधास्त एक क्लिनिक सुरू केलं. एवढंच नाही तर मोठ्या आजारांवर उपचार करण्याचा खोटा दावा करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. भयंकर गोष्ट म्हणजे त्याला औषधांचं स्पेलिंगही माहित नाही, ते येत नाही. बहोरापूर गावात ही घटना घडली आहे.
देवेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये बारावी नापास झालेला अभिनय प्रताप सिंह स्वतःला मोठा डॉक्टर म्हणवतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो त्याचं क्लिनिक चालवत आहे असं म्हटलं. दररोज जिल्ह्यातील तसेच प्रतापगड, जौनपूर, सुलतानपूर, रायबरेली आणि बाराबंकी येथून शेकडो रुग्ण उपचारांसाठी या क्लिनिकमध्ये येतात. बारावी नापास झालेला हा डॉक्टर रुग्णांना आयुर्वेदिक आणि इतर औषधं देऊन उपचार करतो पण त्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही.
डॉक्टरकडे दररोज येतात मोठ्या संख्येने लोक
तक्रारदाराने असाही आरोप केला आहे की, दररोज मोठ्या संख्येने लोक डॉक्टरकडे येतात. अशा परिस्थितीत उपचार घेण्यासाठी एक महिना आधीच नंबर लावावा लागतो. उपचारासाठी आलेल्या लोकांपैकी सुहेल अहमद आणि अमिना बानो यांनी सांगितलं की, ते गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टरांकडे येत आहेत, परंतु त्यांना नंबर मिळत नाही. महिनाभरापूर्वी नंबर लागला होता पण उपचार घेता आले नाहीत.
औषधांचं येत नाही स्पेलिंग
क्लिनिकमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो रुग्णांना दिलेल्या औषधाचं नाव हिंदीत सांगत आहे. त्याच वेळी जेव्हा त्याला औषधाचं स्पेलिंग विचारलं गेलं तेव्हा त्याला स्पेलिंगही वाचता आलं नाही. या संदर्भात डीईओ डॉ. अनिता गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, हे क्लिनिक विभागाकडे रजिस्टर्ड आहे की नाही आणि तिथे कोणत्या प्रकारचे उपचार दिले जातात हा तपासाचा विषय आहे. जर अशी तक्रार असेल तर आम्ही चौकशी करू. चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.