महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत सरकारने जो आकडा दिला, त्यापेक्षा जास्तीचा आकडा असल्याचा दावा विरोधी पक्षांसह विविध स्तरावर केला जात आहे. आज राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांनी मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा दावा केला आहे. अशातच या चेंगराचेंगरीमागे कट असल्याचा संशय एसटीएफला येत आहे.
मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. काही मृतदेहांवर ६० च्या वरचे नंबर लिहिलेले होते, असेही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले जात आहे. करोडो लोक उपस्थित असलेल्या महाकुंभमध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने काही लोक घुसले होते असा संशय तपास यंत्रणांना आला आहे.
महाकुंभमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी एआय कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेरांनी एकाच बसमधून आलेल्या १२० जणांना टिपले आहे. हे संदिग्ध महाकुंभमध्ये गोंधळ घालण्यासाठी आले होते, असे सुत्रांकडून सांगितले जात आगे. या लोकांना ओळखण्यासाठी चौकशी केली जात आहे. याचबरोबर छोटी मोठी दुकाने, माळा, प्रसाद आदी विकणाऱ्या फिरत्यांनाही विचारले जात आहे. या कटाच्या तपासासाठी १२ अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे.
एक नाही तीन वेळा चेंगराचेंगरी...दैनिक भास्करच्या दाव्यानुसार महाकुंभमध्ये ही एकच चेंगराचेंगरी नाही तर तीन ठिकाणी चेंगराचेगरी झाली आहे. या दुसऱ्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही हॉस्पिटलच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. काही मृतदेहांना झाकलेल्या पिशवीवर ६१, ६२- ६३ असे आकडे लिहिलेले होते. तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले मृतदेह आणि विविध हॉस्पिटलमध्ये असलेले मृतदेह, नाव न समजलेले मृतदेह यांच्या आकड्याचा मेळही लागत नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे.