आधार कार्ड न मिळाल्याने ११ वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या
By Admin | Updated: August 26, 2014 12:17 IST2014-08-26T12:17:04+5:302014-08-26T12:17:22+5:30
आधार कार्ड मिळत नसल्याने निराश झालेल्या ११ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे.

आधार कार्ड न मिळाल्याने ११ वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. २६ - आधार कार्ड मिळत नसल्याने निराश झालेल्या ११ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. मुलाच्या हाताचे ठसे घेता येत नसल्याने त्याला आधार कार्ड मिळत नव्हता.
विशाखापट्टण जिल्ह्यातील कोलीगौडा गावातील सरकारी आश्रम शाळेत काही दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्याची सूचना देण्यात आली होती. आधार कार्ड काढल्यावर मुलांच्या स्कॉलरशिपची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा करता येणार होती. या शाळेत सहावी इयत्तेत शिकणा-या ११ वर्षाच्या मुलाने आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर धाव घेतली. मात्र मुलाच्या एका हाताची तीन बोटे जुळलेली होती व त्यामुळे हाताचे ठसे येत नव्हते. या कारणावरुन त्याला आधार कार्ड काढून देण्यास नकार देण्यात आलाचा आरोप मुलाच्या कुटुंबाने केला आहे. विविध केंद्रावर प्रयत्न करुनही आधार कार्ड मिळत नसल्याने तो निराश झाला होता. घरातील सर्वजण झोपले असताना त्या मुलाने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून शिक्षण अधिका-यांनीही आदिवासी विभागाच्या अधिका-यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.