In 11 months, Statue of Unity got 26 lakh visitors | 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट

ठळक मुद्देगेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. तब्बल 71.66 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पंतप्रधान मोदी 31 ऑक्टोबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत.

गांधीनगर - जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. गेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. तसेच तब्बल 71.66 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. 

गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत असतात. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन एन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. गेल्या 11 महिन्यांत 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. त्यामुळे राज्याला तब्बल 71.66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती मिळत आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 ऑक्टोबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबरला जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, इको-टुरिझम, जंगल सफाई आदींसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. तसेच या पुतळ्याचा देखभाल करण्यासाठी दिवसाला 12 लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' साकारण्यात आले आहे. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' हे 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारण्यात आलं असून त्यामध्ये तब्बल 102 प्रजातीची झाडं लावण्यात आली आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रेक्षक गॅलरीतून परिसर नयनरम्य दिसावा यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' मध्ये अनेक दूर्मिळ प्रजातीची झाडं आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासोबत ही सुंदर जागा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
 

Web Title: In 11 months, Statue of Unity got 26 lakh visitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.