अहमदाबाद : अहमदाबाद आणि सुरत येथे शनिवारी (दि. २६) झालेल्या मोठ्या कारवाईत एक हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी ही माहिती दिली. घुसखोरांविरोधात गुजरातपोलिसांनी केलेली ही आजवरची मोठी कारवाई आहे.
अहमदाबादमध्ये ८९०, तर सुरतमध्ये १३४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. घुसखोरांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर व्हावे अन्यथा त्यांनाअटक करून हकालपट्टी करण्यात येईल. अवैधरीत्या भारतात आलेल्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही संघवी यांनी सांगितले.
गुजरात पोलिसांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधून या घुसखोरांनी बनावट कागदपत्रे मिळवून भारतात प्रवेश केला. त्यानंतर ते गुजरातमध्ये स्थायिक झाले. त्यातील काही जण अमलीपदार्थांची तस्करी, मानवी तस्करी तसेच अल्-कायदाशी संबंधित 'स्लीपर सेल'मध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. गुजरात एटीएसने अल्-कायदाशी संबंधित चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांनी स्थानिक युवकांची माथी भडकाविण्याचे काम केले.