१०० दिवसांच्या कामगिरीचे वेध
By Admin | Updated: June 18, 2014 05:22 IST2014-06-18T05:22:19+5:302014-06-18T05:22:19+5:30
या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतील अशी किमान १० लोकाभिमुख कामे अथवा योजना सादर कराव्यात, असे ताजे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आले आहेत.

१०० दिवसांच्या कामगिरीचे वेध
नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावून दिल्लीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला येत्या ३ सप्टेंबर रोजी १०० दिवस पूर्ण होतील तेव्हा लोकांच्या भल्यासाठी वास्तवात भरीव काम केल्याचे दिसावे यासाठी प्रत्येक मंत्रालयाने व विभागाने या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतील अशी किमान १० लोकाभिमुख कामे अथवा योजना सादर कराव्यात, असे ताजे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आले आहेत.
माहीतगार सूत्रांनी सांगितले की, जलद निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम सुरू करता यावे यासाठी मंत्रालयांनी अशी कामे वा योजना लवकरात लवकर तयार कराव्यात, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘जनतेने मोठ्या आशा-आकांक्षा उराशी बाळगून भाजपाला सत्ता दिलेली असल्याने पहिल्या १०० दिवसांतच काही तरी भरीव काम केल्याचे लोकांना प्रत्यक्ष दिसावे याला सरकारकडून साहजिकच प्राधान्य देण्यात येत आहे.
शिवाय केवळ प्रशासकीय निर्णय घेण्याऐवजी लोकाभिमुख कारभार करण्यासही यामुळे विविध मंत्रालयांना उद्युक्त केले जाऊ शकेल’
‘मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कसा कारभार करावा, याची मार्गदर्शिका ठरवून दिली आहे. पहिल्या १०० दिवसांत करायच्या कामांचे वेळापत्रक तयार करण्यास त्यांनी मंत्र्यांना सांगितले आहे’, असे संसदीय कार्य मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)