गुजरातमध्ये १० दहशतवादी घुसले
By Admin | Updated: March 6, 2016 10:09 IST2016-03-06T09:48:54+5:302016-03-06T10:09:08+5:30
गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने दहा दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.

गुजरातमध्ये १० दहशतवादी घुसले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने दहा दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जानजुआ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सोमवारी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्या दरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या इराद्याने हे दहशतवादी घुसल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे.
लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांचे हे दहशतवादी असल्याची माहिती पाकिस्तानी एनएसएने दिली आहे. पाकिस्तानने प्रथमच विशेष स्वरुपाची ही गुप्तचर माहिती भारताला दिली आहे.
गुजरातमधील सर्व सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या असून, संवेदनशील आणि संभाव्य धोका असलेल्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक पी.सी.ठाकूर यांनी तातडीची बैठकही घेतली आहे. पोलिस महासंचालकांनी पुढील सूचनेपर्यंत सर्व पोलिसांची सुट्टी रद्द करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. शनिवारी रात्री उशिरा या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.