कुंभमेळा सुरू झाल्यानंतर ब्रॅण्डिंगसाठी १० कोटी !
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:54+5:302015-08-20T22:09:54+5:30

कुंभमेळा सुरू झाल्यानंतर ब्रॅण्डिंगसाठी १० कोटी !
>नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बॅ्रण्डिंग तसेच प्रसिद्धीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कुंभमेळा सुरू होऊन महिना लोटल्यानंतर शासनाचे वरातीमागून घोडे हाकण्याच्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील वर्षी उज्जैन येथे होणार्या कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग मध्य प्रदेश सरकारने नाशिक येथे कधीच सुरू केले आहे. मात्र, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे १४ जुलैपासून सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे बॅ्रण्डिंग व प्रसिद्धीसाठी राज्य शासनाने आता कुठे १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे शहाणपण दाखविले आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे म्हणून विकसित करण्यासाठी, तसेच कुंभपर्वाचा त्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी प्रसिद्धीची गरज पाहता राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला जाणार आहे. विभागीय आयुक्तांना ब्रॅण्डिंगसाठी एक आराखडा तयार करून तो माहिती व जनसंपर्क महासंचालकांकडून मान्य करून घ्यावा लागणार आहे. प्रसिद्धी अथवा ब्रॅण्डिंगच्या कोणत्याही कामाकरिता निविदाप्रक्रियेचाच अवलंब करण्याची सूचना करण्यात आली असून, तीन लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या बाबीसाठी ई-निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेशित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)