10 crore fraud in the name of linking Aadhaar | बापरे... आधार लिंक करण्याच्या नावाखाली 10 कोटींची फसवणूक
बापरे... आधार लिंक करण्याच्या नावाखाली 10 कोटींची फसवणूक

नवी दिल्लीः आधार लिंक करण्याच्या नावाखाली काही महाभागांनी 1 हजारांहून अधिक जणांना 10 कोटींचा गंडा घातला आहे. दिल्ली पोलिसांनी या चोरांच्या टोळक्यांचा पर्दाफाश केला आहे. या भामट्यांनी आतापर्यंत 1 हजारांहून अधिक वयोवृद्धांना 10 कोटींनी अधिकच्या रकमेचा गंडा घातला आहे. बँक अकाऊंट किंवा फोन नंबरला आधारशी लिंक करण्याच्या नावाखाली हे भामटे वयोवृद्धांची फसवणूक करून बँक खाते आणि इतर दस्तावेजांच्या माहिती मिळवत होते. त्यानंतर गरिबांना पैसे देऊन त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन नवी खाती उघडत होते, या नव्या खात्यांमध्ये त्या वयोवृद्धांचे पैसे ट्रान्सफर करून लोकांना गंडा घालण्याचा धंदा सुरूच होता.

पोलिसांनी बँकांमध्ये चौकशी करून कशा प्रकारच्या 1100 खात्यांचा शोध घेतला आहे. या भामट्याचं जाळं राजधानीत विस्तारलेलं आहे. या टोळीचा म्होरक्या झारखंडमधील अलिमुद्दीन अन्सारी आहे. पोलिसांनी अलिमुद्दीन आणि आझमगडच्या मनोज यादवला अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यातील 81 डेबिट कार्ड, 104 चेकबुक, 130 पासबुक, 8 फोन, 31 सिम कार्ड, आयडी प्रूफची फोटोकॉपी इत्यादी सामान जप्त करण्यात आलं आहे.

त्या वयोवृद्धांच्या बँकेतून गरिबांच्या खात्यात पैसे वळते केल्यानंतर लागलीच हे चोर ते पैसे काढून घेत असत. गरिबांची बँक खाती 1100 रुपयांपासून उघडण्यात आली आहेत. या टोळीचा मनोज यादव हे काम करत होता. तो कामगारांना 2 रुपये देऊन खातं उघडत होता. पैसे दिल्यानंतर या लोकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती घेत होता. या लोकांबरोबर जाऊन आधार कार्डचा अॅड्रेस बदलून घेत होता आणि चुकीच्या पत्त्यावर खाती उघडत होता. यादरम्यान मनोज स्वतःचाच नंबर बँकेत रजिस्ट्रर करत होता.  
कसे बनवत होता शिकार
या फसवणुकीचा मास्टर माइंड असलेला अलिमुद्दीन अन्सारी वयोवृद्धांना फोन करून बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगत होता. त्यानंतर तो लोकांकडून बँक अकाऊंट किंवा फोन नंबर आधार कार्डला लिंक करून त्यांच्या नावे बँक अकाऊंट, डेबिट कार्ड आणि फोन नंबर, सिम कार्डची माहिती मिळवत होता. त्यानंतर तो एक मेसेज पाठवत होता आणि त्याला 121वर फॉरवर्ड करण्यास सांगत होता. तो मेसेज सिम कार्ड लॉक करण्याचा असायचा. त्यानंतर त्या फसवणूक झालेल्या वयोवृद्धांचं सिम कार्ड डिएक्टिवेट होत असत. तसेच अलिमुद्दीन नवा सिम कार्ड मिळवत असतो त्याद्वारे ओटीपी प्राप्त करत होता. 


Web Title: 10 crore fraud in the name of linking Aadhaar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.