जि.प. अध्यक्षपदाकडेही येवलेकरांचे लक्ष
By Admin | Updated: March 3, 2017 00:46 IST2017-03-03T00:46:02+5:302017-03-03T00:46:37+5:30
येवला : पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सभापतिपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा रंगत आहेत.

जि.प. अध्यक्षपदाकडेही येवलेकरांचे लक्ष
येवला : पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सभापतिपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा रंगत असून, सभापतिपद इतर मागासवर्ग महिला राखीव असल्याने अंदरसूल गणातून सेनेच्या नम्रता जगताप आणि सावरगाव गणातून आशाबाई साळवे निवडून आल्या आहेत. यापैकी कोणाची वर्णी सभापतिपदी लागणार याबाबत उत्सुकता लागून आहे.
येवला पंचायत समितीत सेनेचे ७ तर राष्ट्रवादीकडे ३ सदस्य निवडून आले आहेत. सेनेकडे बहुमत असल्याने भगवा फडकणार हे निश्चित असले तरी अडीच वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या या पदावर प्रथम जगताप की साळवे यापैकी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
येवल्याच्या पंचायत समिती सभापतिपदाबाबत पवार - दराडे यांना जिल्ह्याच्या राजकारणातून उसंत मिळाल्यानंतर हे दोघे येवल्याच्या सभापतिपदाबाबत निर्णय घेतील. तालुक्याच्या सभापतिपदाची संधी तालुक्याच्या उत्तरेला की पूर्वेला द्यायची? याचा निर्णय होणे बाकी आहे. आमदार छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा फटका राष्ट्रवादीच्या सत्तास्थानाला बसला. येवला पंचायत समितीवर विविध गणातील सात जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध करीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राष्ट्रवादीला अंबादास बनकर यांनी तारले. पंचायत समितीत राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. येवला पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी पक्षाकडे सत्ता आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या पंचायत समितीत शिवसेना सत्तेवर आली आहे. शिवसेनेला अपक्ष किंवा इतर कुणाचीही मदत घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
येवल्याला आमदार छगन भुजबळ यांच्यामुळे अंदरसूल गटातून राधाकिसन सोनवणे, तर राजापूर गटातून मायावती पगारे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळून लाल दिवा मिळाला होता. यंदा पुन्हा तिसऱ्यांदा लाल दिवा येवल्याला मिळतोय काय? यासाठीही कमालीची धावपळ चालू आहे.
येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार झालेल्या भाजपासह राष्ट्रीय कॉँग्रेसला खातेदेखील उघडता आले नाही. सेना-भाजपाची युती तुटली. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी बिघडली. भाजपासह कॉँग्रेसची वाताहत झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेली येवला पंचायत समितीची ही निवडणूक सत्तांतर घडविणारी ऐतिहासिक ठरली.