जिल्हा परिषदेची आज विशेष सभा
By Admin | Updated: March 27, 2016 00:02 IST2016-03-26T23:13:56+5:302016-03-27T00:02:08+5:30
विकासाचे प्रस्ताव : ३५ कोटींचा सादर होणार अर्थसंकल्प

जिल्हा परिषदेची आज विशेष सभा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चे मूळ व २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यासाठी उद्या रविवारी (दि.२७) सुटी असूनही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत अनेक नावीन्यपूर्ण
उपक्रमांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र मागील वेळेइतकाच ३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
२२ मार्च रोजी तहकूब करण्यात आलेली ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली अर्थसंकल्पीय सभा आता रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. बांधकाम व अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे हे अर्थसंकल्प सादर करतील.
दहा दिवसांपूर्वीच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. तरीही काही वेळापुरता का होईना, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रकाश वडजे सभागृहात हजेरी लावतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३५ कोटींच्या अर्थसंकल्पात ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’, जिल्हा परिषद ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेच्या पाझरतलावांमधील मत्सबीजपालन ठेका यांसह विविध नवीन योजना या वर्षाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्याचे कळते. (प्रतिनिधी)