जिल्हा परिषदेची आज विशेष आमसभा
By Admin | Updated: April 15, 2017 23:30 IST2017-04-15T23:30:38+5:302017-04-15T23:30:59+5:30
विषय समित्यांचे खातेवाटप; सदस्यांची होणार निवड

जिल्हा परिषदेची आज विशेष आमसभा
नाशिक : जिल्हा परिषदेची रविवारी (दि.१६) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, या विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांचे तीन पदाधिकाऱ्यांना खातेवाटप तसेच विविध दहा विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होत असून, सभेच्या विषय पत्रिकेत विविध विषय समित्यांचे खातेवाटप तसेच विविध विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत विषय समित्यांसाठी नामनिर्देशन व माघारी तसेच दुपारी २ वाजता विशेष सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. विषय क्रमांक दोननुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ८३(२) च्या तरतुदीनुसार जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अन्य दोन समित्यांचे सभापती यांच्याकडे विषय समितींचा पदभार सोपविण्याबाबत कार्यवाही आहे. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समिती तसेच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितींचे पदसिद्ध सभापती आहेत. तसेच समाजकल्याण, महिला व बालकल्याण समिती सभापती यांची पदनामनिशी ५ एप्रिलला निवड झालेली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व अन्य दोन विषय समिती सभापती यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा विषय समित्यांचे वाटप करावयाचे आहे. कलम ८३ (३) नुसार कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी एक सभापती असेल तर अर्थ, बांधकाम, शिक्षण व आरोग्य या चार समित्यांचा प्रभार प्रत्येकी दोन याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.
विषय क्रमांक तीननुसार स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे, तर विषय क्रमांक ४ नुसार जलव्यवस्थापन समितीवरील सहा सदस्यांची निवड करण्यात येईल. विषय क्रमांक ५, ६ व ७ नुसार अनुक्रमे कृषी, समाजकल्याण व शिक्षण समितीवर सदस्यांची निवड करण्यात येईल.
विषय क्रमांक-८ नुसार बांधकाम समिती सदस्यांची निवड करण्यात येईल. बैठकीचे एकूण १२ विषय असून, त्यानुसार सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)