जिल्हा परिषद निवडणूक; दुपारनंतर मतदारांच्या रांगा
By Admin | Updated: February 21, 2017 15:46 IST2017-02-21T15:46:10+5:302017-02-21T15:46:10+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

जिल्हा परिषद निवडणूक; दुपारनंतर मतदारांच्या रांगा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 21 - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुरू असलेल्या मतदानासाठी दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३४.३३ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक मतदान पेठ तालुक्यात ५२ टक्के झाले असून तर सर्वात कमी मतदान दिंडोरी तालुक्यात २८ टक्के झाले. काही ठिकाणी दुपारच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
दिंडोरी तालुक्यातील वणीनजिक भातोडे गावात इव्हीएम मशिनमधील तांत्रिक अडचणीने अनेकांना खोळंबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. मालेगाव येथे दुपारी १.३० वाजेपर्यंत केवळ २८.८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. आंतरराष्ट्रीय धावपटू तथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत-तुंगार हिने आपल्या कुटूंबासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. पेठ तालुक्यात सकाळपासून सर्वच केंद्रावर मतदारांनी मोठया प्रमाणावर गर्दी केल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
तर एका मतदान केंद्राला आजूबाजूचे गाव पाडे जोडलेली असल्याने अनेक मतदारांना दोन चार किमी पायपीट कारीत मतदान करण्यासाठी यावे लागत होते. पेठ तालुका हा दर्याखोरयांनी वेढलेला असलेल्याने प्रशासनाला मतदान केंद्राशी संपर्क साधतांना चांगलीच कसरत करावी लागली. बहुतांश गावांना नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने क्षेत्रिय आधिकार्यांना दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी उपलब्ध करून घेण्यासाठी कसरत करावी लागली.
पेठ तालुक्यात एकूण ७३०२५ मतदार असून यामध्ये बहुतांश मतदार रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याने अशा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. तर सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थलांतरीत मतदार राजाचा शोध घेतल्याचे दिसून येत होते.