जिल्हा परिषद सभापती निवडणूक
By Admin | Updated: October 3, 2014 00:38 IST2014-10-03T00:03:40+5:302014-10-03T00:38:26+5:30
हालचालींना वेग, राष्ट्रवादीकडून सर्वच पक्षांना गोंजारण्याचे प्रयत्न

जिल्हा परिषद सभापती निवडणूक
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी येत्या शनिवारी (दि.४) निवडणूक होणार असून, त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीने सर्वच पक्षांना गोेंजरण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसने मात्र तटस्थच राहण्याचा निर्णय घेतला असून, गरज भासल्यास राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढविणाऱ्या पक्षांना बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. तिकडे भाजपा व शिवसेनेनेही मोर्चेबांधणी केली असली तरी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. येत्या ४ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. मागे ऐनवेळी राष्ट्रवादीने उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवून कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्याने कॉँग्रेसचे सदस्य दुखावले आहेत. त्यातही कॉँग्रेसमधील एका गटाशी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले दोन सदस्य सातत्याने संपर्कात असून, तुम्हाला हव्या त्या दोन समित्या घ्या, मात्र आमच्यासोबत या असे सुचवित आहेत. मात्र कॉँग्रेसचे १४ पैकी दहा सदस्य राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नाही. एका महिला सदस्याने कॉँग्रेसच्या अन्य सदस्यांना फोन करून आपण १४ पैकी सहा जण फुटून राष्ट्रवादीला मिळू, दोन समित्या भेटत आहेत, असे सांगितल्याचे कळते. त्याचप्रमाणे कॉँग्रेसच्या एका सदस्याने शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याशी संधान साधून शिवसेनेच्या कोट्यातून आपल्याला संधी द्यावी, अशी गळ घातल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या इच्छुक सदस्यांकडून सातत्याने कॉँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सततच्या घडामोडी जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे शनिवारी (दि.४) नेमके काय घडते, यावरच बरेच काही अवलंबून आहे.(प्रतिनिधी)