हिमालय बाबांना मागितली झेड प्लस सुरक्षा व्यवस्था
By Admin | Updated: July 31, 2015 00:23 IST2015-07-31T00:22:39+5:302015-07-31T00:23:01+5:30
आमदाराचे पत्र : महंतांच्या अनुयायांकडून धोका

हिमालय बाबांना मागितली झेड प्लस सुरक्षा व्यवस्था
नाशिक : महंत ग्यानदास यांनी मागील आठवड्यात माजी मंत्री बबन घोलप यांचे गुरू हिमालय बाबा यांच्याविरुद्ध टीका-टीपणी केल्यानंतर हिमालय बाबांना आता साधुग्राममध्ये असुरक्षित वाटू लागले असून, त्यांच्या जिवाला साधू-महंतांच्या अनुयायांकडूनच धोका असल्याचे पत्र आमदार योगेश घोलप यांनी थेट पोलीस महासंचालकांना धाडले आहे. हिमालय बाबांना पोलिसांनी तत्काळ झेड प्लस सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार घोलप यांनी केली आहे.
मागील आठवड्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे तथाकथित अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी साधुग्राममध्ये कोट्यवधी रुपये खर्चून मंडप टाकणाऱ्या हिमालय बाबांविरुद्ध टीकास्त्र सोडले होते. कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेल्या धार्मिकनगरीत येणाऱ्या नागरिकांना नारळ वाहा, तेल वाहा असे सांगून त्यांचे खिशे रिकामे करण्याचे काम म्हणजे अध्यात्म नव्हे, असा कानमंत्र महंत ग्यानदास यांनी माजी आमदार बबन घोलप यांचे गुरू हिमालय बाबा यांना दिला होता. त्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बबन घोलप यांचे पुत्र आमदार योगेश घोलप यांनी थेट पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनाच पत्र लिहून हिमालय बाबांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी केली आहे. आमदार योगेश घोलप यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, हिमालय बाबांचा तपोवनातील साधुग्राम परिसरात यज्ञ मंडपात अखंड ज्योतीचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, बाबांविरुद्ध काही संत-महंत नैराश्येच्या भावनेतून उलट सुलट विधाने करत आहेत. सदर कार्यक्रम अत्यंत धार्मिक असून, त्यात कोणताही गोंधळ झालेला नाही; परंतु काही साधूंच्या भक्त अथवा अनुयायांकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)