नाशिकच्या प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:31+5:302021-08-27T04:19:31+5:30
नाशिक : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे २०२० या वर्षाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार नाशिकचे युवा साहित्यिक, नाटककार ...

नाशिकच्या प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार
नाशिक : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे २०२० या वर्षाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार नाशिकचे युवा साहित्यिक, नाटककार प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
प्राजक्त यांचे संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरले आहे. संतश्रेष्ठ तुकारामांच्या पत्नी आवलीच्या पायातला काटा विठ्ठलाने काढला, या आख्यायिकेचा आधार घेऊन प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला नाट्यप्रेमी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या पुस्तकालादेखील अनेक पुरस्कारांनी यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. सन्मानस्वरूप ताम्रपत्र आणि ५० हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासोबतच मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले. बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या पुराणपुरुष या पुस्तकासाठी त्यांना हाच युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
इन्फो
हा चाळिसावा पुरस्कार
या पुरस्कारासाठी तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच आशा बगे आणि लक्ष्मीकांत देशमुख या तज्ज्ञांनीही या पुरस्कारासाठी काम पाहिले. प्राजक्त यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आतापर्यंत ३९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कारही प्राजक्त यांना मिळालेला आहे.
इन्फो
आख्यायिका ते नाटक
आवलीच्या पायातला काटा विठ्ठलाने काढला, या आख्यायिकेचा आधार घेऊन प्राजक्त देशमुख यांनी संत तुकारामाची बायको आवली आणि दुसरी विठ्ठलाची बायको रखुमाबाई या दोन अलक्षित स्त्रियांना एकत्र आणत हे नाट्य जिवंत केले आहे. तुकोबांना न्याहरी घेऊन चाललेल्या आवलीच्या पायात काटा रुततो अणि ती बेशुद्ध पडते. त्यानंतर विठ्ठलाच्या आज्ञेवरून आणि तुकोबांच्या विनंतीला मान देऊन रखुमाबाई लखूबाई होऊन आवलीला घेऊन घरी येते. तिचा पाय बरा होईपर्यंत तिची शुश्रूषा करते. तिला घरकामात मदत करते. यादरम्यान दोघी बोलतात. या संवादातूनच त्या एकमेकींना समजून घेत त्यांना आलेले आत्मभान असा हा आलेख नाटकातून आणि पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
फोटो
२६ प्राजक्त देशमुख आणि देवबाभळी