‘चॉकलेट डे’च्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:15 IST2016-02-08T23:27:45+5:302016-02-09T00:15:56+5:30
‘चॉकलेट डे’च्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई सज्ज

‘चॉकलेट डे’च्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई सज्ज
नाशिक : व्हॅलेंटाइन डे सप्ताहांतर्गत उद्या सर्वत्र ‘चॉकलेट डे’ साजरा केला जाणार असून, त्यासाठी किशोरवयीन मुले व तरुणाई वेगवेगळ्या चॉकलेट, कॅडबरीजच्या प्रकारांसह सज्ज झाली आहे. शहरातील विविध लहान- मोठ्या दुकानांमधून, स्विट्स शॉपमधून चॉकलेट्स, कॅडबरी यांबरोबर क्रिम बिस्कीट, स्निकर्स यांचीही आगाऊ खरेदी करण्यावर भर देण्यात आल्याचे चित्र होते. आपल्या प्रियजनांची केकची आवड लक्षात घेऊन काही जणांनी चॉकलेट केक, मफीन्स, पेस्ट्रीजलाही प्राधान्य दिले. जवळच्या व्यक्तीला ब्लॅक फॉरेस्ट केक, पायनॅपल केक देऊन आश्चर्यचकित करण्याचाही प्लॅन अनेकांनी बनविला आहे. कॅडबरी सेलिब्रेशनच्या मोठाल्या पॅकेजमध्ये वैविध्यपूर्ण आकारात असणारे आणि लाल खोक्यातील चॉटलेट, दुधाच्या घट्ट आवरणात लपलेल्या काजू, बदाम, अक्रोडच्या नटीजना मोठी मागणी आहे. चॉकलेटीअर चॉकलेटचीही यंदा चलती पहायला मिळते आहे. नट्स सोबत फ्रुट्सच्या प्रकारांमध्ये बदाम आणि सुकलेल्या द्राक्षांचा (मनुका-बेदाणे आदि) मिलाफ असतो. चॉकलेटच्या या सर्वात मखमली अवतारासही मोठी मागणी आहे. तोंडात टाकल्यानंतर काही क्षणातच विरघळून जिभेला परमोच्च आनंद देणाऱ्या या महागड्या चॉकलेट्स आणि नटीजसाठी चॉकलेटप्रेमी खिसा थोडा सैल सोडत असल्याचेही दिसत आहे. सोनेरी कागदात बांधून दिलेल्या हेजलनट, वेफर आणि चॉकलेट यांचं अनोखं मिश्रण असलेला चॉकलेटच्या लाडूंना लहानग्यांसह तरुणाईचीही पसंती लाभत आहे. सुकामेवा घालून चॉकलेट स्प्रेड हा प्रकारही यंदा लोकप्रिय आहे. चॉकलेटच्या साम्राज्यात यंदा स्निकर्सही भाव खावून जात असून, मिल्क चॉकलेटमध्ये भाजलेले पिस्ते, शेंगदाणे, नॉगट आणि कॅरामल यांची अफलातून युती असलेल्या या प्रकारांना मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)