पवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचा खून
By Admin | Updated: April 29, 2015 23:41 IST2015-04-29T23:41:13+5:302015-04-29T23:41:32+5:30
४५०० रुपयांची लूट

पवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचा खून
नांदगाव : पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात बिहार येथील परप्रांतीय तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. बचावासाठी सरसावलेल्या मृताच्या भावाला दोघा हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवत खिशातील रोकड काढून नांदगाव रेल्वे फाटकाजवळ पलायन केले.
नाशिक येथील राणेनगर परिसरात हॉटेलवर काम करणारे सुनीलकुमार साफी (२०) व महेशकुमार साफी रा. हमाडर, पोस्ट जितबापुर थाना रहिका, जि. मधुबनी, बिहार हे नाशिकरोड रेल्वे स्थानकातून बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पवन एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यातून बिहार येथे जाण्यासाठी निघाले. मनमाड येथून डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी सुनीलकुमार यास धक्काबुकी करत चाकू काढून त्याच्या छातीच्या उजव्या भागावर वार केले. हल्लेखोरांनी सुनीलकुमार याचा भाऊ महेशकुमार यास त्याच्या भावाच्या पॅण्टच्या खिशातील पैसे काढण्यास धमकावले. भीतीने भेदरलेल्या भावाने ४५०० रु पये काढून हल्लेखोरांच्या हवाली केले. त्यानंतर हल्लेखोरांनी नांदगाव फाटकाजवळ चेन पुलिंग करून रक्ताने माखलेला शर्ट बदलून पलायन केले. जखमी सुनीलकुमार याला अन्य प्रवशांनी रेल्वे फाटकावर उतरवले. रिक्षाचालकाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉ. रोहन बोरसे यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना मनमाड व नांदगाव स्थानकादरम्यान घडल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)
भरदिवसा तरु णाचा खून होतो यावरून रेल्वे सुरक्षेची दैना उडाली असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली आहे.