अनैतिक संबंधातून युवकाची हत्त्या
By Admin | Updated: February 28, 2015 23:49 IST2015-02-28T23:48:47+5:302015-02-28T23:49:00+5:30
संशयितास अटक : विंचूरगवळी येथील घटना

अनैतिक संबंधातून युवकाची हत्त्या
पंचवटी : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकास लोखंडी गजाने बेदम मारहाण करून तिघांनी खून केल्याची घटना उघडकीस आली़ आडगाव शिवारातील नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर घडलेल्या या घटनेत मृत युवकाचे नाव राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा़ खातोळे, जि़ हिंगोली) आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शाळेच्या वॉचमनला ताब्यात घेण्यात आले आहे़
राजू हिंगोले व नवजीवन शाळेचा वॉचमन बाळू खिल्लारे या दोघांचेही हिंगोली येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते़ दोन-तीन दिवसांपूर्वी संशयित खिल्लारे याने सदर महिला व हिंगोले या दोघांनाही फोन करून नाशिकला बोलावले़ त्यानुसार हे दोघेही आडगाव शिवारातील नवजीवन पब्लिक स्कूलमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या बाळू खिल्लारेच्या घरी आले़ या ठिकाणी पाहुणचार झाल्यानंतर शुक्रवारी रात्री खिल्लारे व हिंगोले हे बाहेर फिरून येतो, असे सांगून घराबाहेर पडले़
त्यानंतर या दोघांमध्ये या महिलेवरून वाद झाले व या वादाचे पर्यावसन बेदम हाणामारीत झाले़ संशयित खिल्लारे व त्याच्या साथीदारांनी हिंगोले यास शाळेच्या मैदानावर लोखंडी गजाने बेदम मारहाण केली़ त्यामध्ये डोके, हात-पायास गंभीर मार लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन शाळेच्या मैदानावर पडला़ यानंतर संशयितांनी घरी येऊन हिंगोले मृत झाल्याचे सांगितले असता, सदर महिलेने त्याचा शोध घेतला असता तो रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले़ तिने काही शिक्षकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी राजू हिंगोलेचा मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, हवालदार सुरेश गवळी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच महिलेकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
दरम्यान, या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात संशयित बाळू ऊर्फ कैलास विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे (दोघेही रा. खातोळे, जि. हिंगोली) व गजानन कुऱ्हाडे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी बाळू खिल्लारे यास ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)