बिबटयाच्या हल्ल्यात युवक जखमी
By Admin | Updated: March 9, 2017 13:56 IST2017-03-09T13:56:31+5:302017-03-09T13:56:31+5:30
नाशिकमधील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरूण जखमी झाला.

बिबटयाच्या हल्ल्यात युवक जखमी
>ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ९ - इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याच्या मादीने दहशत माजवली असून, शेतात तग लावून बसलेल्या बिबट्याने आज येथील 23 वर्षीय युवकावर हल्ला करून जखमी केले.
राहुलनगर येथील गणपत नवसु भले वय (23) हा युवक सकाळी सातच्या सुमारास शेतीकडे जात असताना बिबट्याने अचानक हल्ला करून पायाला चावा घेतला. आरडाओरडा केल्याने ग्रामस्थानी धाव घेताच बिबट्याने पलायन केले.
इगतपुरीच्या वनविभागाला तात्काळ संपर्क करून कळवण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, वनपरिमंडल अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक आर टी पाठक यांनी ग्रामस्थानच्या मदतीने तातडीने सदर युवकास घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या परिसरात बिबट्या बसलेल्या स्थितीत आढळतात. येथील युवकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.