सटाणा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार
By Admin | Updated: July 30, 2016 23:55 IST2016-07-30T23:38:07+5:302016-07-30T23:55:30+5:30
सटाणा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

सटाणा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार
सटाणा : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील डांग्या मारुतीजवळ पल्सरला वाळूच्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ब्राह्मणपाडे येथील उच्च शिक्षित तरुण जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी १२ वाजता ही दुर्घटना घडली.
बागलाण तालुक्यातील मूळ ब्राह्मणपाडे येथील पांडुरंग बुवाजी अहिरे यांचा मुलगा राहुल अहिरे (२३) हा पल्सर (एमएच १५ डीडी ३९६४) वरून विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरून सटाण्याकडे येत असताना डांग्या मारुतीजवळ वाळूच्या डंपरने (एमएच १५ सीके १२४८) त्याच्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालकाने ओव्हरटेकच्या नादात राहुलच्या अंगावर डंपर घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पुणे येथे उच्चशिक्षण घेऊन नुकताच नोकरीला लागलेला राहुल आई-वडिलांना भेटण्यासाठी काल दुपारी पुण्याहून गावी आला होता. आज दुपारी तो सटाणा येथील मित्रांना भेटण्यासाठी सटाण्याकडे निघाला असता काळाने त्याच्यावर झडप घातली.
राहुलचे आई-वडील बागलाण तालुक्यात प्राथमिक शिक्षक असून, आई हरणबारी, तर वडील धनाळेपाडा प्राथमिक शाळेत नोकरी करतात. (वार्ताहर)