कर्जाला कंटाळून करंजाड येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:01 IST2019-01-24T20:00:21+5:302019-01-24T20:01:30+5:30
जायखेडा : शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या विवंचनात सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (२८) याने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविली.

एकनाथ गोविंद चित्ते
जायखेडा : शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या विवंचनात सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (२८) याने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविली.
सकाळपासून तोे घरातून बेपत्ता होता. त्यांच्या आई सरूबाई चित्ते या सायंकाळी त्यालाना शेतात शोधण्यासाठी गेल्या असता एकनाथ शेतात बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी त्वरीत आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. असता पोलिस पाटील प्रवीण देवरे व सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे, दिपक वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेतली, व त्याला तातडीने सटाणा ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
जवळपास दोन एकर शेती त्याच्या वडीलांच्या नावे असून सहकारी सोसायटीचे व देना बँकेचे सव्वा लाखाच्या आसपास कर्ज आहे. तसेच काही हात उसनवार पैसे घेतले आहेत. हे पैसे फेडावे तरी कसे या विवंचनेतुनच एकनाथने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
विभागीय पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे, तहसीलदार प्रमोद हिले यांनी घटनास्थळी भेट देऊन चित्ते कुटुंबियांचे सांत्वन केले. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोये पुढील तपास करीत आहेत. एकनाथ यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे.
(फोटो २४ एकनाथ चित्ते)