अल्पवयीन मुले पालकांच्या स्वाधीन
By Admin | Updated: July 30, 2016 00:27 IST2016-07-30T00:17:54+5:302016-07-30T00:27:59+5:30
मनमाड : रेसुब कर्मचाऱ्यांची सतर्कता

अल्पवयीन मुले पालकांच्या स्वाधीन
मनमाड : गोदान एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना कुटुंबीयांशी चुकामूक झाल्यामुळे भेदरलेल्या अल्पयवीन मुलांना मनमाड रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासात पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. विशेष म्हणजे या घाबरलेल्या बालकांसह त्यांच्या ताब्यात असलेले ४५ हजार रुपयांचे किमती सामान पालकांना सुरक्षित मिळाले आहे.
गोदान एक्स्प्रेसमधून मकबूल मसूद बेग (रा. सागडी जि. आजमगड) हे आपले दोन पाल्य अनास व आयेशा यांच्या समवेत आरक्षित बोगीतून प्रवास करत होते. गाडी नाशिक रेल्वे स्थानकावर थांबली असता मकबूल हे पाणी पिण्यासाठी फलाटावर उतरले. दरम्यान, गाडी सुरू झाल्याने त्यांना गाडी पकडता आली नाही. गाडी सुरू झाल्यानंतरही वडील गाडीत न आल्याने ही बालके घाबरली होती. मनमाड रेसुबचे उपनिरीक्षक आर. के. मिना व रजनिश यादव यांना याबाबत तत्काळ माहिती देण्यात आली. गाडीला मनमाड येथे थांबा नसतानाही गाडी मनमाड स्थानकावर थांबवून रेसुब कर्मचाऱ्यांनी या बालकांना बोगीतून सामानासह उतरून घेतले. मागच्या गाडीने त्यांचे पालक मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेसुब कार्यालयात भेदरलेल्या बालकांसह किमती सामान पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. रेसुब निरीक्षक के. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली. (वार्ताहर)