किरकोळ कारणावरून पंचवटीत युवकाचा खून
By Admin | Updated: July 10, 2015 23:22 IST2015-07-10T23:21:39+5:302015-07-10T23:22:51+5:30
फुलेनगरमधील दुर्घटना : शौचालयात पाणी टाकण्याचे निमित्त

किरकोळ कारणावरून पंचवटीत युवकाचा खून
पंचवटी : जिल्हा महिला सहकारी बँकेतील महिला कर्मचारी वर्षा देशमुख यांच्या खुनास एक दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी शौचालयात पाणी टाकण्याच्या कारणावरून दोघा संशयितांनी योगेश पांडुरंग कुयटे (२५) या युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरातील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली़ यावेळी वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मयत युवकाच्या मामावरही संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
फुलेनगर परिसरातील त्रिमूर्तीनगरमध्ये पांडुरंग कुयटे हे आपले तीन मुले व पत्नीसह राहत असून, मोलमजुरी करतात़ शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा दोन नंबरचा मुलगा अतुल हा येथील सार्वजनिक शौचालयात गेला़ त्याठिकाणी पाणी टाकण्याच्या कारणावरून संशयित आरोपी सागर बर्वे व नितेश प्रल्हाद राऊत या दोघांनी अतुलसोबत वाद घालून त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ या मारहाणीची माहिती मिळताच अतुलचे वडील पांडुुरंग कुयटे, योगेश कुयटे व मामा रंगनाथ ताकाटे हे वाद मिटविण्यासाठी गेले़