यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे सराव सामना
By Admin | Updated: July 23, 2014 00:35 IST2014-07-22T01:23:40+5:302014-07-23T00:35:53+5:30
चंद्रशेखर टिळक : मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे सराव सामना
नाशिक : मोदी सरकारने शपथविधी घेतल्यानंतर ५० दिवसांत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘अच्छे दिन अब आनेवाले है’ असे नाही, तर ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हटले आहे. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा सराव सामना असून, त्यात नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट व लघु उद्योग भारती आयोजित अर्थसंकल्पविषयक व्याख्यानात बोलताना केले.
मुंजे इन्स्टिट्यूटच्या सभागृहात ‘अंदाजपत्रक २०१४ : औद्योगिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना टिळक यांनी सांगितले, यंदाच्या अर्थसंकल्पात काही नाही यापेक्षा जे आहे त्याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, याचा विचार करावा. मुळात ५० दिवसांत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीला साडेसहा ते सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मास्टरस्ट्रोक अशा तीन तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. सरकारने काश्मिरी निर्वासितांसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे काश्मिरी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती वाढणार आहे. संरक्षण या शब्दाची व्याप्ती रुंदावणारा हा अर्थसंकल्प आहे. ही एक केवळ तरतूद नाही तर त्यात देशाला पुढे नेणारा विचार आहे. अरुणाचल प्रदेशात एक हजार टेलिकॉम कम्युनिकेशन टॉवर उभे राहणार आहेत. राजकारण बाहेर टाकणारी ही तरतूद आहे. मणिपूरमध्ये स्पोर्ट्स अकॅडमीची उभारणी हा सुद्धा मोठा मास्टरस्ट्रोक आहे. रुढार्थाने संरक्षणात न बसणाऱ्या, पण संरक्षण करणाऱ्या या तरतुदी असल्याचेही टिळक यांनी सांगितले. सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पोस्ट, बॅँका उभ्या राहतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. प्रारंभी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)