यंदा गणेशमूर्ती खरेदीविना तशाच पडून
By Admin | Updated: September 6, 2016 23:11 IST2016-09-06T23:09:41+5:302016-09-06T23:11:13+5:30
आर्थिक फटका : शाडूमातीचा प्रसार, विक्रेत्यांची संख्या वाढल्याचा परिणाम

यंदा गणेशमूर्ती खरेदीविना तशाच पडून
नाशिक : शहरात शाडूमातीच्या मूर्तींचा वाढलेला वापर आणि त्यातच व्रिकेत्यांची वाढलेली संख्या यामुळे अनेक व्यावसायिकांना यंदा आर्थिक फटका बसला. अनेक विक्रेते दुसऱ्या दिवशी मूर्ती तेथेच ठेवून गेल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाला. अखेरीस विनवण्या करून विक्रेत्यांना मूर्ती नेण्यास भाग पाडले.
शहरात जवळपास महिनाभर अगोदरच गणेशमूर्तींसाठी स्टॉल विक्रीस प्रारंभ होत असतो. मुख्य बाजारपेठेत गणेश चतुर्थीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदरच बाजारपेठ सुरू असली तरी गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठ अलीकडे गोल्फ क्लबपासून ते डोंगरे मैदान, गंगापूररोड, कॉलेजरोड, आकाशवाणी टॉवरजवळ असलेल्या बाजाराबरोबरच द्वारका ते पुणेरोडपर्यंत मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी स्टॉल्स थाटले होते. शहरात गणेशमूर्ती विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे. सोमवारी सर्वत्र पारंपरिक पद्धतीने पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी शहरातील गोल्फ क्लब मैदान, द्वारका ही गणेशमूर्ती विक्री केंद्राची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अनेक गणेशमूर्ती तशाच पडून राहिल्याचे चित्र मंगळवारी बघायला मिळाले.
पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने शाडूमातीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल वाढल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना काही प्रमाणात फटका बसला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील विविध मंडळे मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करतील अशी शक्यता मूर्ती व्यावसायिक बाळगून होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट सार्वजनिक मंडळांनी देखाव्यांवर भर देत यंदा छोट्या आकारातील मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या आकारातील मूर्तींना फारसा उठाव मिळाला नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
नाशिक शहरात पेण, मुंबई, कल्याण आदि ठिकाणाहून मूर्ती मागवण्यात आल्या होत्या तसेच शहरात नाशिकसह शहराच्या बाहेरीलदेखील व्यावसायिकांची संख्या वाढल्याने मूर्ती विक्री केंद्रांच्या संख्येतदेखील दरवर्षीपेक्षा वाढ झाल्याने ग्राहक विखुरला गेल्याचा फटकाही व्यावसायिकांना बसला. काही व्यावसायिक, तर मूर्तीसाठी कच्चा माल २०० रुपयात उपलब्ध होत असेल तर त्याबदल्यात ५०० रुपये कमविण्याच्या दृष्टीनेही गणेशमूर्ती विक्रीच्या व्यवसायात उतरू पहात असल्याने व्यावसायिकांच्या संख्येतही परिणामी वाढ होत आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस मूर्तींना भाव चढतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच अनेक नागरिक मूर्ती नोंदवून ठेवतात. त्यामुळेदेखील गणेश चतुर्थीच्या दिवशी अन्य मूर्ती विकल्या जात नाहीत.
राजस्थान, अहमदाबाद, गुजरात, सुरत या ठिकाणांहून येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होत आहे. (प्रतिनिधी)