पाथर्डी भागात यंदा दांडिया रासची धूम
By Admin | Updated: October 10, 2015 22:57 IST2015-10-10T22:57:05+5:302015-10-10T22:57:41+5:30
पाथर्डी भागात यंदा दांडिया रासची धूम

पाथर्डी भागात यंदा दांडिया रासची धूम
पाथर्डी फाटा : गेली दोन-तीन वर्षे नवरात्रीत शांत असलेल्या पाथर्डी फाटा परिसरात दीड वर्षाने होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ठिकठिकाणी दांडिया रासची धूम पहायला मिळणार आहे. दोन-तीन वर्षे शांत राहिलेल्या मंडळांनी आणि काही नवीन मंडळांनीही पाथर्डी फाटा परिसरात दांडिया रासच्या आयोजनाची तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे. सोबत पाथर्डी, पिंपळगाव खांब येथील काही मंडळांनीही नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन केल्याने यंदा नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस रंगणार आहेत.
पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरमधील स्वामी सर्मथ मित्रमंडळाच्या गेल्या तीन-चार वर्षे बंद पडलेल्या दांडिया रासला यावर्षी आयोजकांनी पुन्हा उजाळा देण्याचे ठरवून तयारी सुरू केली आहे. मंडळाने दांडिया राससोबत लकी ड्रॉचेही आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अजय दहिया आणि अध्यक्ष कमल अग्रवाल यांनी दिली आहे.
प्रशांतनगरमध्येही चतुशृंगी मित्रमंडळ आणि माजी नगरसेवक संजय नवले यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रीकर भवनजवळील सप्तशृंगी मैदानावर महिलांसाठी दांडिया रासचे आयोजन असल्याची माहिती संजय नवले, अँड. दिलीप खातळे, रमेश बूब, नामदेव बोराडे यांनी दिली. याशिवाय ज्ञानेश्वरनगर येथेही शिवकृपा मित्रमंडळाने भव्य नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे, असे अध्यक्ष बाळकृष्ण शिरसाठ यांनी सांगितले. (वार्ताहर).