रयतेच्या राजास मानाचा मुजरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:10 IST2020-02-19T23:55:35+5:302020-02-20T00:10:27+5:30
क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली.

सार्वजनिक जयंती उत्सव समितीसह विविध संस्था, संघटना व मंडळांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला होता.
नाशिक : क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे येणारी जयंती शहरात विविध संस्था, संघटना, मित्रमंडळांतर्फे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता शहरातील वाकडी बारव येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, भाजपचे गटनेते जगदीश पाटील, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, माजी खासदार समीर भुजबळ, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, राष्टÑवादीचे रंजन ठाकरे, संजय खैरनार, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाटील, उदयनराजे भोसले यांच्या भगिनी मनीषाराजे भोसले-पाटील, त्यांचे सुपुत्र यशराजे पाटील, सुरगाणा संस्थानच्या सोनालीराजे पवार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ झाला.
वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज चौक, धुमाळ पॉइंटमार्गे मिरवणूक पंचवटी कारंजा येथे पोहोचली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांतर्फे चित्ररथांचे स्वागत करून मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदींसह मर्दाणी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. काठीच्या सहायाने तरुणाच्या हातावर, डोक्यावर ठेवलेले नारळ फोडणे अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके या तरुणांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.