सटाणा : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश ए.जी. तांबोळी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ मधील तरतुदी व मनोधैर्य योजना - पीडितांना नुकसानभरपाई या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. सटाणा न्यायालयात कर्मचारी हेमंत देवरे यांनी जागतिक जलदिनाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्वव सर्वांना पटवून दिले.
आज पाण्याचे दुर्भिक्ष बघता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे सांगून पाणी वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आवाहन केले. सटाणा न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.ए. आव्हाड यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ क अन्वये नद्या, नाले, सरोवरे यांचे जतन व संवर्धन करणे, त्यांची निगा राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे, याची जाणीव करून दिली. तसेच प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा व पाणी मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे, यावर मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून निसर्गाला पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले व पाणी बचतीचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रम आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून सहन्यायमूर्ती ए.जी. तांबोळी व सटाणा न्यायालयाचे कर्मचारी हेमंत देवरे उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी सार्थक कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमास सटाणा न्यायालयातील पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते.