चर्चमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना
By Admin | Updated: December 25, 2016 01:38 IST2016-12-25T01:36:04+5:302016-12-25T01:38:58+5:30
प्रभू येशू जन्मोत्सव : विद्युत रोषणाईने नटली प्रार्थनास्थळे

चर्चमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना
नाशिक : विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव शनिवारी मध्यरात्री शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला.
ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा सण नाताळची तयारी काही दिवसांपासून सुरू होती. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च, वावरे लेन येथील संत थॉमस चर्च, त्र्यंबक नाक्यावरील होलिक्रॉस चर्च, नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिर, इंदिरानगर येथील जॉर्ज चर्च यांसह नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदि भागांतील चर्च रोषणाईने न्हाऊन निघाले होते. आठवडाभरापासून विविध चर्चच्या प्रांगणात रंगरंगोटीसह सजावटी व गव्हाणीच्या देखाव्याची तयारी सुरू होती. शनिवारी सायंकाळी ४ वाजता बाप्तिस्मा विधी झाला. त्यानंतर रात्री १० पासून प्रार्थनास्थळांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. ‘मिडनाइट सर्व्हिस’ उपदेश व पवित्र सहभागितेचा विधी झाला. सर्वच चर्चमध्ये पारंपरिक उत्साहात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.