कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

By Admin | Updated: March 11, 2017 23:24 IST2017-03-11T23:24:03+5:302017-03-11T23:24:46+5:30

नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली

Workers of the workers run by the Deputy Commissioner | कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली असून, कंपनीच्या वर्तणुकीमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, क्रॉम्प्टन कंपनीत आयटक युनियनचे कामगारांनी सभासदत्व घ्यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर दबाव टाकला जात असून, २०१५ पासूनचा पगारवाढीचा करार बहुमत असलेल्या युनियनसोबत करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे.  प्रस्थापित युनियन व व्यवस्थापन सेवा निवृत्त होणाऱ्या कामगारांना आर्थिक नुकसान करून घेत असल्याचे सांगून इच्छा नसतानाही जबरदस्तीने आयटक युनियनचे सभासदत्व स्वीकारावे यासाठी दबाब टाकत आहे. कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात ११ मे २०१५ रोजी कामगारांनी कायदेशीररीत्या सूचना देऊन संप केला असतानाही तो बेकायदेशीर असल्याचे ठरवून अठरा कामगारांना निलंबित करण्यात आले. असे निलंबन करताना चुकीच्या पद्धतीने कामगारांना गोवण्यात आले व त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.  कंपनीकडून सुरू असलेला मानसिक छळ पाहता वेळोवेळी कामगार उपआयुक्त कार्यालयात तक्रार करूनही उपयोग न होता, उलटपक्षी कामगारांवर दिवसेंदिवस अन्याय होत असल्याने त्यांचे कुटुंब त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने निलंबित केलेल्या वा बडतर्फ केलेल्या कामगाराने जिवाचे बरे-वाईट केले तर त्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापन व आयटक युनियनवर राहील, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
या निवेदनावर चंद्रकांत गुरव, सोबू नायडू, शरद पाटील, सोमनाथ जाधव, दिलीप चिते, प्रकाश देशमुख, मोरेश्वर पिंगळे, वाळू भोर, प्रकाश कदम, प्रदीप निंबाळकर यांच्यासह तीनशेहून अधिक कर्मचाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Workers of the workers run by the Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.