मजदूर संघाचे धरणे आंदोलन सुरूच
By Admin | Updated: January 20, 2016 23:46 IST2016-01-20T23:45:52+5:302016-01-20T23:46:34+5:30
सदोष नोटा छपाई प्रकरण : कामगारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

मजदूर संघाचे धरणे आंदोलन सुरूच
नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातून ‘सिक्युरिटी तार’ नसलेल्या १ हजाराच्या ३०० दशलक्ष (मिलीयन) सदोष नोटा छपाई प्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापनाने तिघा कामगारांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी बुधवारी मजदूर संघाच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
मुद्रणालय महामंडळाच्या होशंगाबाद येथील कागद निर्मितीच्या कारखान्यातून जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात एक हजाराच्या नोटा छापण्यासाठी कागद पाठविण्यात आलेल्या कागदामध्ये ‘सिक्युरिटी तार’ नव्हती. चलार्थपत्र मुद्रणालयाला १ हजाराच्या ५०० मिलियन नोटा छापण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३०० मिलियन नोटा छापण्यात आल्या त्यापैकी छापलेल्या १०० मिलियन नोटा मुद्रणालयातून रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविल्यानंतर बॅँकेने त्या नोटा राष्ट्रीयीकृत बॅँकामार्फत बाजारात व्यवहारासाठी चलनात आणल्या. रिझर्व्ह बॅँकेने तत्काळ राष्ट्रीयीकृत बॅँकांना बाजारामध्ये चलनात गेलेल्या ‘सिक्युरिटी तार’ नसलेल्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहे.
केंद्राच्या अर्थ खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी होशंगाबाद कागद निर्मिती कारखान्याचे व्यवस्थापक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर होशंगाबाद कारखान्यातील तांत्रिक विभागाचे व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक यांना लागलीच निलंबित करण्यात आले होते.
मुद्रणालय व्यवस्थापनाने एक हजार रुपयाच्या सदोष नोटा छपाईप्रकरणी सीएनपीच्या कंट्रोल विभागातील साहेबराव उगले, रमेश देवरे, बंडू संवत्सकर या तीन कामगारांना सोमवारी सायंकाळी निलंबीत केले. तर उपनियंत्रण अधिकारी मरीयन पॉल, कंट्रोल विभाग निरीक्षक संजय दाभाडे, जे.डी. देशमुख, व्ही.व्ही. बुरबुरे, सहायक निरीक्षक संजय थोरात, गणेश औटी या सहा अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून ‘दोषारोपपत्र’ देण्यात आले.
सदोष नोटा छपाईप्रकरणी तीन कामगारांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीदेखील महाप्रबंधक संदीप जैन यांच्या कार्यालयाबाहेर मजदूर संघाच्या वतीने सायंकाळ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महाप्रबंधक जैन यांच्याशी निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा केली; मात्र व्यवस्थापनाने कुठलाही निर्णय अथवा आश्वासन दिले नाही. यामुळे गुरुवारी देखील मजदूर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत मजदूर संघाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. आपला पॅनलने कामगारांवरील निलंबन रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र केल्यास मजदूर संघाच्या पाठीशी राहणार असल्याचे अशोक गायधनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)