बसने दिलेल्या धडकेत सातपूरला कामगार ठार
By Admin | Updated: July 27, 2014 01:54 IST2014-07-27T00:49:01+5:302014-07-27T01:54:27+5:30
बसने दिलेल्या धडकेत सातपूरला कामगार ठार

बसने दिलेल्या धडकेत सातपूरला कामगार ठार
सातपूर : कारखान्यात रात्रपाळी करून घरी जाणाऱ्या कामगारांच्या दुचाकीला अज्ञात शहर वाहतूक शाखेच्या बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़
सातपूर औद्योगिक वसाहतीतील इप्कॉस कंपनीतील कायम कामगार पांडुरंग कोंडाजी डगळे (२०, रा़ महिरावणी) व कंत्राटी कामगार राकेश ऊर्फ योगेश हरी ओतारी (२१, रा़ शिवाजीनगर) दोघेही रात्रपाळी करून दुचाकीने (क्रमांक एमएच १५, ईएल ८४७१) घरी जात होते़
शनिवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास एबीबी कंपनीसमोर शहर वाहतूक बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली़ यात दुचाकीवर पाठीमागे बसलेले राकेश ओतारी हे बसखाली सापडल्याने जागीच ठार झाले, तर चालक पांडुरंग डगळे गंभीर जखमी झाले आहेत़ यानंतर घटनेची माहिती न देता बसचालक फरार झाला़
पांडुरंग डगळे हे कायम कामगार रात्रपाळी करून आपल्या दुचाकीने महिरावणीला जात असताना कंत्राटी कामगार राकेश ओतारी याने लिफ्ट मागितली व शिवाजीनगरपर्यंत सोडण्यास सांगितले़ त्यानुसार ओतारी दुचाकीवर पाठीमागे बसले आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली़ अपघाताचे वृत्त समजताच इप्कॉस कंपनी व्यवस्थापनाने तातडीने अॅम्ब्युलन्स पाठविली होती़
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेले पांडुरंग डगळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघात प्रकरणी सातपूर पोलिसांनी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए़ एम़ देशमुख करीत आहेत़ (वार्ताहर)