पाथरे : अज्ञात वाहनाच्या धडकेत पाथरे येथील रहिवासी व कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्यातील कामगार माधव नामदेव सिनारे (५७) यांचाजागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सिनारे संजीवनी सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होते. दुपारी कामावरून सुटी झाल्यानंतर ते त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीने (क्र. एमएच १७ डीपी २२८०) पाथरे गावाकडे परत येत असताना सदर अपघात झाला. झगडे फाटा ते पोहेगावदरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. सिनारे यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या खिशातील ओळखपत्राहून त्यांची ओळख पटली. सिनारे वर्षभरानंतर साखर कारखान्यातून सेवानिवृत्त होणार होते. कारखान्यात नोकरी करतानाच शेतीसह चहा पावडर व अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या निधनाची वृत्त येताच संजीवनी कारखाना व पाथरे परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. पाथरे येथील ग्रामपंचायत सदस्य राजीव सिनारे यांचे ते चुलते होत. पाथरे येथे अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगार जागीच ठार
By admin | Updated: December 4, 2015 21:50 IST