वावी शाखेचे कामकाज झाले सायंकाळी सुरू

By Admin | Updated: May 6, 2014 22:32 IST2014-05-06T22:32:25+5:302014-05-06T22:32:25+5:30

वावी : शेतकर्‍यांसह ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शाखेला आॅनलाइनद्वारे जोडले आहे.

The work of Wavi Branch started in the evening | वावी शाखेचे कामकाज झाले सायंकाळी सुरू

वावी शाखेचे कामकाज झाले सायंकाळी सुरू

 वावी : शेतकर्‍यांसह ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शाखेला आॅनलाइनद्वारे जोडले आहे. जिल्हा बॅँकेचा उद्देश चांगला असला तरी, बीएसएनएलच्या धरसोड कारभाराचा फटका शेतकर्‍यांसह ग्राहकांना बसत आहे. बीएसएनएलच्या इंटनेट सुविधेचा येथे बोजवारा उडाल्याने जिल्हा बॅँकेच्या वावी शाखेचे कामकाज बँक बंद होण्याच्या वेळेला म्हणजे सायंकाळी ५ वाजता सुरू करण्याची वेळ आली. वावी येथील जिल्हा बॅँकेची शाखा गेल्या आठवड्यात आॅनलाइन करण्यात आली. त्यासाठी बीएसएनएलचे कनेक्शन घेण्यात आले आहे. मंगळवारी वावी येथील आठवडे बाजार असल्याने सकाळी ११ वाजेपासून ग्राहकांनी बॅँकेत मोठी गर्दी केली होती. मात्र बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडल्याने बॅँकेचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होऊ शकले नाही. वावी परिसरातील खेड्यापाड्यातून बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना बॅँकेतून पैसे काढता न आल्याने त्यांना बाजार करण्यासाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र होते. दिवसभरात जिल्हा बॅँकेच्या शाखेत शेकडो ग्राहकांनी गर्दी केली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास इंटरनेट सुविधा सुरू झाल्यानंतर कामकाज सुरू झाले. यावेळी ग्राहकांनी बॅँकेत गर्दी केली होती. यामुळे कर्मचार्‍यांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. जिल्हा बॅँकेने केवळ बीएसएनएलच्या कारभारावर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय सध्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत शेतकर्‍यांना खरिपाचे कर्ज वितरण केले जात आहे. वावी व परिसरातील विकास संस्थेकडून शेतकर्‍यांना जिल्हा बॅँकेचे धनादेश देण्याचे कामकाज सुरू आहे. शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीत हातउसणे पैसे घेऊन सोसायटीचे पैसे भरले आहे. त्यानंतर त्यांना विकास संस्थेकडून नवीन कर्ज वितरण केले जात आहे. त्यात जिल्हा बँकेचे कामकाज आॅनलाइन व्यवहारामुळे दिवसभर बंद पडल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यापुढे ग्राहकांना व शेतकर्‍यांना पैसे काढण्यासाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागू नये यासाठी जिल्हा बॅँकेने पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वावी विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The work of Wavi Branch started in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.