मडकीजांब गावतळ्याचे काम निकृष्टच
By Admin | Updated: July 29, 2016 01:18 IST2016-07-29T01:17:25+5:302016-07-29T01:18:08+5:30
अभियंत्यांचा दौरा : लवकरच अहवाल होणार सादर

मडकीजांब गावतळ्याचे काम निकृष्टच
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पहिल्याच पावसात वाहून गेलेल्या मडकीजांब येथील गावतळ्याचे काम निकृष्ट पद्धतीने बांधल्यानेच फुटल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गुरुवारी (दि.२८) प्रभारी उपअभियंता व्ही. के. सोनवणे व शाखा अभियंता रावसाहेब देवरे यांनी मडकीजांब गावाला भेट देऊन संबंधित गावतळ्याच्या कामाची पाहणी केली. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी त्यांना तत्काळ जाऊन गावतळ्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी बुधवारी (दि.२७) या फुटलेल्या गावतळ्याच्या कामाची पाहणी केली होती. ११ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे मडकीजांब येथील गावतळे फुटून एका शेतकऱ्याच्या दीड एकर शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे करण्यात आली होती. फुटलेल्या गावतळ्याबाबत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना विचारणा केली असता, त्यांनी मात्र आपल्याकडे दिंडोरी उपविभागाकडून अशी कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडजे यांनी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना मडकीजांब येथील झालेल्या गावतळ्याच्या कामाबाबत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाघमारे यांनी उपअभियंता व्ही. के. सोनवणे यांना याप्रकरणी चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी मडकीजांबच्या फुटलेल्या गावतळ्याच्या कामाची पाहणी केली होती. प्रथमदर्शनी गावतळ्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे त्यांना दिसून आले. आता उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत व तपासणीमध्येही ही बाब समोर आल्याने ग्रामपंचायतीवर व पर्यायाने ग्रामपंचायतीने नेमलेल्या ठेकेदारावर कारवाईची शक्यता आहे. (प्रतिनिधी)