वनविभागाच्या नियमानुसारच वनौषधी उद्यानाचे काम
By Admin | Updated: September 30, 2016 02:13 IST2016-09-30T02:08:50+5:302016-09-30T02:13:28+5:30
वनविभागाच्या नियमानुसारच वनौषधी उद्यानाचे काम

वनविभागाच्या नियमानुसारच वनौषधी उद्यानाचे काम
वनमंत्री : काम पूर्णत्वाचे दिले आदेशनाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या नेहरू वनोद्यानातील वनौषधी उद्यानाचे काम वनविभागाच्या कोणत्याही नियमाला बाधा न पोहोचता करण्याचे आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख सर्जन भगत यांच्यासह नाशिक वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर पांडवलेणीलगत असलेल्या नेहरू वनोद्यानात ९३ हेक्टर क्षेत्रात वनौषधी उद्यान साकारण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सदर उद्यान साकारले जात असून, टाटा ट्रस्टमार्फत सदर काम केले जाणार आहे. सदर क्षेत्र हे वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वनोद्यान संलग्न परिसराचा विकास महापालिकेच्या साहाय्याने करण्यात येणार असून, त्यासाठी वनविकास महामंडळ आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करारही झालेला आहे. दरम्यान, टाटा ट्रस्टमार्फत काम करताना वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वनमंत्रालयाकडे गेल्या होत्या. त्यानुसार, बैठक होऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या नियमांना बाधा न पोहोचता सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)