दिंडोरी तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले

By Admin | Updated: June 5, 2016 23:27 IST2016-06-05T23:13:12+5:302016-06-05T23:27:49+5:30

नाराजी : २००६ मध्ये मंजुरी मिळूनही काम अर्धवट

Work of Dindori taluka sports complex | दिंडोरी तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले

दिंडोरी तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले

 वणी : आदिवासी भागाच्या सहभागातून क्रीडा निपुणतेत नावलौकिक मिळाल्यामुळे क्रीडाविश्वाचा प्रसार व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने क्रीडा संकुल निर्मितीस अग्रक्रम देण्यात आला. मात्र मोठा गाजावाजा करून सुरू झालेले क्रीडा संकुलाचे काम गेल्या काही कालावधीपासून रखडल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल निर्मिती आवश्यक असल्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. काही ठिकाणी यास मूर्त स्वरूप आले असले, तरी दिंडोरी तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने वणी-मुळाणा रस्त्यावर केआरटी हायस्कूलशेजारी अंदाजे अडीच एकर जागा ग्रामपालिकेने उपलब्ध करून दिली. सन २००६ साली २६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेत संरक्षक भिंत व सपाटीकरण याचा समावेश होता. तद्नंतर ७५ लाख रुपये क्रीडा संकुलासाठी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.
क्रीडा अधिकारी कार्यालय, जिम्नॅशियम हॉंल, कबड्डी, खो-खो मैदान, व्हॉलिबॉल मैदान धावण्यासाठी दोनशे मीटरचा ट्रॅक अशा सुविधांचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सदरचे काम पूर्ण करण्याची तरतूद होती. या कामाच्या देखरेखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मंजूर निधी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये समितीकडे हस्तांतरित करण्यात येतो. जिल्हाधिकारी यांना सहाय्यभूत म्हणून क्रीडा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रांत अधिकारी या समितीचे अध्यक्ष होते. तहसीलदार व नियुक्त सदस्यांचा समावेश समितीत होता. समितीच्या निर्णयानंतर बांधकाम खात्याच्या हालचाली सुरू करण्याची तरतूद होती.
दरम्यानच्या कालावधीत सदरचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, संबंधितांची उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हे काम रेंगाळले आहे. याठिकाणी संरक्षक भिंत व इमारतीव्यतिरिक्त काहीच काम झाल्याचे दिसून येत नाही. सदरचे काम संबंधितांच्या स्मृतिपटलावरून निघून गेले की काय, असा सवाल क्रीडाप्रेमींच्या मनात आहे. (वार्ताहर )

Web Title: Work of Dindori taluka sports complex