महिलांचा प्रवेश : त्र्यंबक देवस्थानची समिती
By Admin | Updated: December 8, 2015 23:25 IST2015-12-08T23:24:42+5:302015-12-08T23:25:11+5:30
महिलांचा प्रवेश : त्र्यंबक देवस्थानची समिती

महिलांचा प्रवेश : त्र्यंबक देवस्थानची समिती
त्र्यंबकेश्वर : मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा दोन महिलांनी निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केल्याने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी देवस्थानच्या अध्यक्ष न्या. ऊर्मिला फलके-जोशी यांनी विश्वस्त मंडळातील चार सदस्यांची समिती नियुक्त केली असून, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यायचा किंवा कसे, याबाबतचा निर्णय ही समिती देणार आहे.
येथील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील गाभाऱ्यात आतापर्यंत महिलांना प्रवेश नव्हता. याबाबत आतापर्यंत कोणी तक्रार वा हरकतही घेतली नव्हती. तथापि, शनिशिंगणापूर येथे एक तरुणीने थेट चौथऱ्यावर चढून दर्शन घेतल्यानंतर प्रवेशबंदी असलेल्या विविध ठिकाणच्या मंदिरात काही महिला प्रतिनिधींनी परवानग्या मागितल्या आहेत. अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने यश संपादन करीत असताना त्यांना गाभाऱ्यात प्रवेश का नको, असा सवाल महिलावर्गातून उपस्थित केला जात असून, येथील सुजाता अशोक पाटील व पूनम स्वप्नील पाटील या महिलांनी पुढाकार घेत बुधवारी (दि. २) एका निवेदनाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी मागितली आहे. त्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी जयंत शिखरे, सत्यप्रिय शुक्ल, कैलास घुले व ललिता शिंदे या चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती काय निर्णय घेते, याकडे येथील नागरिकांसह सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)