मांडवडच्या महिलांचा तहसीलसमोर ठिय्या

By Admin | Updated: July 22, 2014 01:04 IST2014-07-21T23:32:38+5:302014-07-22T01:04:51+5:30

मोर्चा : तहसीलदारांना निवेदन; प्रश्नांचा भडिमार

The women of Mandavad stood before the tahsil | मांडवडच्या महिलांचा तहसीलसमोर ठिय्या

मांडवडच्या महिलांचा तहसीलसमोर ठिय्या

नांदगाव : दहा दिवसांपूर्वीच स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नसल्यामुळे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या मांडवड येथील महिलांनी आज पुन्हा एकदा तहसील कार्यालयात आपला जोरदार आवाज उठवला. आजच्या मोर्चाचे नेतृत्व विजय अहेर, दीपक काकळीज यांनी केले.
एकीकडे महिलांची घोषणाबाजी सुरु असताना मांडवडच्या ग्रामस्थांनी पुरवठा अधिकारी विजय थोरात यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत थोरातांनी २४८ कार्ड वितरण २३ जुलैपर्यंत करू, दुकानदाराचा परवाना निलंबित करू, सोसायटीला मांडवडचे दुकान जोडू, नियंत्रित दराने रॉकेल विक्री करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिल्याने मांडवड येथील या महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलन सुरू असतानाच तालुक्यातील कऱ्ही येथील महिलाही धान्य दुकानदाराकडून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन धडकल्यात. या महिलांना मात्र कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन मिळाले नाही. धान्य दुकानदारांविरुद्धच्या तक्रारी वाढत असताना चौकशी सुरु आहे, कार्यवाही करू अशी साचेबंद उत्तरे संबंधितांकडून मिळत आहेत. रेशनकार्ड मिळवायचे असल्या पाच हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात, एवढे करुनही मिळालेल्या रेशन कार्डांवर धान्य मिळत नाही या तक्रारींचे प्रमाण वाढू लागल्याने नांदगाव तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नेमके नियंत्रण कोणाचे? रेशनकार्ड बोगस म्हणून तहसीलदार पुरवठा विभागाकडे अंगुलीनिर्देश करतात तर हे सर्व बोगस ठरणार असेल तर यंत्रणाप्रमुख म्हणून तहसीलदार ते रद्द का करत नाहीत असा बचाव पुरवठा विभागातील कर्मचारी करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The women of Mandavad stood before the tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.