येवल्यात महिलेची पोत लांबविली
By Admin | Updated: September 26, 2016 01:06 IST2016-09-26T01:05:04+5:302016-09-26T01:06:01+5:30
येवल्यात महिलेची पोत लांबविली

येवल्यात महिलेची पोत लांबविली
येवला : येथील वल्लभनगर परिसरात पत्ता विचारण्याचा बहाणा करून मोटरसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी एका विवाहित महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला प्रफुल्ल लोणारी, रा. वल्लभनगर, बदापूररोड यांनी येवला शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्या पतीसोबत रविवारी सकाळी फिरायला गेले असता, पाय दुखावल्याने त्या रस्त्यातून एकट्याच माघारी फिरल्या. घराजवळ काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोघे जण आले. या परिसरात सोनवणे क्लास कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी मंगला यांच्याकडे केली. काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले व पाठमोरी होऊन घरात जाण्यासाठी वळताच या अज्ञात चोरट्यांनी मंगला यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून नेली. अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)