महिला पदाधिकाऱ्याचा संपर्कप्रमुखाला हिसका
By Admin | Updated: June 9, 2014 00:19 IST2014-06-09T00:14:31+5:302014-06-09T00:19:30+5:30
शिवसेना : संयम सुटला, कारभारावर केली उघड टीका; सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातच घडला प्रकार

महिला पदाधिकाऱ्याचा संपर्कप्रमुखाला हिसका
नाशिक : शिवसेना महिला आघाडीचे जिल्हाप्रमुखपद मिळावे, यासाठी लॉबिंग करणाऱ्या दोन गटातील अंतर्गत गटबाजीमुळे अखेर एका पदाधिकारी महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट संपर्कप्रमुखांनाच आव्हान देत त्यांच्या कार्यपद्धतीविषयी खडे बोल सुनावले. अर्थात या घटनेचा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इन्कार केला असला तरी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात एखाद्या महिला पदाधिकाऱ्याने संपर्कप्रमुखांनाच धडा शिकविण्याची भाषा करावी, याविषयीची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती. सदर महिला पदाधिकारी पंचवटी येथील असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत मनपाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम हा इच्छुकांच्या मुलाखती घेणे, असा असला तरी अनेक पदाधिकाऱ्यांनी मिर्लेकर यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यात सेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश होता.
शिवसेनेच्या महिला आघाडीचे जिल्हाप्रमुखपद तसेच संघटकपदासाठी महिला गटाकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पदाच्या या स्पर्धेतूनच ज्येष्ठ आणि नवीन पदाधिकारी अशा वादाला तोंड फुटले. त्यामुळे महिलांमध्ये दोन गट पडले. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्हीही गट एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी शह-काटशहचा डावपेच खेळत असल्याची चर्चा आहे. आजही मिर्लेकर यांच्यासमोर असाच काहीसा प्रकार घडला. एका गटाच्या महिला पदाधिकारी मिर्लेकर यांना भेटल्यामुळे दुसऱ्या गटातील एक महिला पदाधिकाऱ्याचा संयम सुटला. तिने तेथेच सेनेच्या कार्यपद्धतीविषयीची जाहीर वाच्यता करण्यास सुरुवात केली. तिला अनेकांनी समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु सदर महिला थेट मिर्लेकर यांच्यासमोर जाऊन धडकल्या. अशा पद्धतीने समोर आलेल्या पदाधिकारी महिलेकडे पाहत मिर्लेकर काही चिडले आणि त्यांनी महिलेस बाहेर जाण्यास सांगितले. आपणाला बोलावले नाही, असे मिर्लेकर म्हणताच त्या महिलेचा पारा चढला आणि तिने थेट मिर्लेकरांच्या समोरच सेनेच्या शिस्तीचे वाभाडे काढले. (प्रतिनिधी)