चंडिकापूर शिवारात महिलेचा खून
By Admin | Updated: September 15, 2015 22:47 IST2015-09-15T22:46:13+5:302015-09-15T22:47:16+5:30
वणी : धारदार शस्त्राने वार

चंडिकापूर शिवारात महिलेचा खून
वणी : चंडिकापूर शिवारात
शेतात वास्तव्यास असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर येथील मोरीचे वावर परिसरात नामदेव सयाजी भोये हे पत्नी लक्ष्मीबाई ऊर्फ कमळाबाई नामदेव भोये (५५) यांच्या समवेत वास्तव्यास असून, अर्धा किलोमीटर अंतरावर मुलगा सुभाष भोये राहतो. सोमवारी रात्री १२.३०च्या सुमारास नाशिक येथे घेवड्याच्या शेंगा विक्री करून आपल्या घरी आले असता लक्ष्मीबाई त्यांच्या नजरेला न पडल्याने नामदेव भोये यांनी हाका मारल्या. तरीही प्रत्युतर न मिळाल्याने घराबाहेर येऊन शोध घेतला.
भोये यांच्या घरी विद्युत जोडणी नसल्याने अंधारात ते चाचपडत लक्ष्मीबाईला हाका मारीत होते. दरम्यान, भोये यांच्या हाताला द्रवपदार्थ सारखे काहीतरी लागल्याने त्यांनी बारकाईने बघितले असता, लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी त्वरित धावत जाऊन मुलगा सुभाष याला सांगितले. परिसरात माहिती समजताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे, किरण बैरागी व पोलीस पथकाने पाहणी केली असता, धारदार शस्त्राने लक्ष्मीबाईच्या मानेवर, डोक्यावर, उजव्या हातावर अमानुष पद्धतीने तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढला. मात्र धागेदोरे हाती लागले नाही. मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी शवविच्छेदन केले असता, सोमवारी रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने लक्ष्मीबाईची हत्त्या झाल्याचा निष्कर्ष काढला.
श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र पावसामुळे माग काढण्यात अपयश आल्याची माहिती अशोक सूर्यवंशी यांनी दिली. भोये कुटुंबीय सधन नाही. कोणाशी त्यांचे वैयक्तिक वैमनस्य नव्हते तरीही लक्ष्मीबाईचा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास सुरू आहे. (वार्ताहर)