पुण्यातील रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
By नामदेव भोर | Updated: April 14, 2023 15:58 IST2023-04-14T15:58:27+5:302023-04-14T15:58:57+5:30
फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पुण्यातील एका रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गंगापूररोड नरसिंहनगर भागातील एका महिलेला अनोळखी व्यक्तीने ८३ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात महिलेने गंगापूर, पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणात ललिता प्रभाकर चौधरी (४४, रा. विक्रांत अपार्टमेंट, नरसिंहनगर, गंगापूररोड ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने ललिता प्रभाकर चौधरी यांना पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन फॉर्ममध्ये भरून घेतली होती. त्या माहितीच्या आधारे संशयिताने चौधरी यांच्या गुगल पे द्वारे एचडीएफसी बँकेतून ८३ हजार रुपयांची रक्कम काढून घेत ललिता चौधरी यांची फसवणूक केली.
त्यामुळे चौधरी यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार कथन करीत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपसासाठी हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ, सिताराम कोल्हे या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"