नाशिक : किडनीचा विकार हा अत्यंत दुर्धर आजार मानला जातो. त्यातही ज्या रुग्णाचे किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे, अशा रुग्णाने कोरोनावर मात करण्यास म्हणूनच विशेष महत्त्व आहे. नाशिकच्या स्नेहल राजेश आव्हाड या किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या महिलेनेदेखील जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांच्या बळावर कोरोनावर मात करुन दाखवली आहे.
साधारणपणे पाच वर्षांपूर्वी स्नेहल राजेश आव्हाड यांच्यावर वयाच्या ३५ व्या वर्षी यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट झाले होते. त्याआधी सुमारे पाच वर्ष त्यांनी किडनीच्या विकाराचा पाच वर्ष सामना करावा लागला होता. त्यामुळे गत वर्षभरापासून स्वत:ला कोरानापासून दूर राखण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याने समस्या निर्माण झाली. किडनी प्रत्यारोपण झाले असल्याने, भीती होतीच. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर दहावर गेल्याने तसेच ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत घसरल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली, त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांसमोरही आव्हान निर्माण झाले. मात्र आजाराला हरविण्याचे जिद्द त्यांच्या मनात कायम होती. यादरम्यान, त्यांनी योगाला अधिक प्राधान्य दिले. त्याचबरोबर योग्य आहार घेण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर आहारात विविध व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आहारात जास्तीत जास्त वापर, लिंबू, अननस, संत्र्याचा ज्यूसही घेतल्याचा फायदा त्यांना झाला.
------------
इन्फो
आप्तस्वकीयांशी संवादातून ऊर्जा
उपचार काळात स्नेहल आव्हाड यांनी स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी आप्तस्वकीयांशी संवाद साधण्याला अधिक प्राधान्य दिले. पती राजेश आव्हाड यांची खंबीर साथ आणि त्यांचे धीराचे बोल यातून त्यांना ऊर्जा मिळत गेली. तसेच कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधणे, त्याचबरोबर नात्यागोत्यातील मंडळी, जवळच्या मैत्रिणी यांच्याशी आनंदाने गप्पा मारणे हे सतत सुरू ठेवले. त्यामुळेच त्यांना अल्पावधीत कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरीदेखील परतणे शक्य झाले आहे. तसेच आता अगदी नियमित अल्पशा व्यायामासह दैनंदिन जीवनही सुरळीतपणे सुरू झाले आहे.