उपनिरीक्षकाकडून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 22:51 IST2016-03-16T22:49:13+5:302016-03-16T22:51:27+5:30
वडाळा चौकी : इंदिरानगर पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

उपनिरीक्षकाकडून महिलेस मारहाण
इंदिरानगर : कौटुंबिक भांडणावरून चौकशीसाठी वडाळा पोलीस चौकीमध्ये बोलावून पोलीस उपनिरीक्षक एस. के. गुर्जर यांनी महिला व मुलास मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वडाळागावातील महेबूबनगर भागातील महिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, जखमी महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. १५) सकाळी दहा वाजेच्या सुमारास महेबूबनगर परिसरात राहणाऱ्या रिझवाना शफीक खान (५०) यांना गुर्जर यांनी चौकशीसाठी वडाळा पोलीस चौकीमध्ये बोलाविले होते. मंगळवारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात रिझवाना यांची सून यास्मीन हिने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी रिझवाना व त्यांचा मुलगा जमीर यास गुर्जर यांनी पोलीस चौकीमध्ये बोलाविले होते. दरम्यान, गुर्जर यांनी जमीर यास मारहाण करण्यास सुरुवात केल्याने रिजवाना यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र गुर्जर यांनी त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांना महिलांच्या शिष्टमंडळाने गुर्जर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे. रिजवाना यांच्या तोंडाला मार लागल्याने त्या बेशुद्ध होऊन चौकीतच कोसळल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इरफाना रऊफ शेख व सईदा शाहीद खान या महिलांनी त्यांना उचलून रिक्षाद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणाबाबत महेबूबनगर भागातील रहिवाशांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धडक देऊ न सावंत यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. गुर्जर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे क रण्यात आली आहे. यावेळी जोपर्यंत दोषी गुर्जर यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा संतप्त महिलांनी घेतल्याने पोलीस अधिकारी पेचात पडले होते. दरम्यान, या घटनेमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने पोलीसांमध्येही खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)