गाजावाजा न करता महापालिकेने दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दिली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:18+5:302021-05-05T04:24:18+5:30
नाशिक - कोणत्याही प्रकारची मदत लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देताना त्याचा गाजावाजा करून समारंभपूर्वक निधी किंवा धनादेश देण्याची पद्धत ...

गाजावाजा न करता महापालिकेने दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दिली मदत
नाशिक - कोणत्याही प्रकारची मदत लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देताना त्याचा गाजावाजा करून समारंभपूर्वक निधी किंवा धनादेश देण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र, गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या वारसांंना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत देताना महापालिकेने कोणताही गाजावाजा केला नाही की समारंभ, थेट घरपोच मदत पाठवली आणि खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे.
शहरात महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन टाकीला गळती लागली आणि त्यामुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाला. त्यामुळे रुग्णालयात एकच धावपळ उडाली. महापालिकेने ज्या कंपनीला टाकीची देखभाल-दुरुस्तीचे काम दिले आहे, त्यांचे कर्मचारी अपयशी ठरल्याने अखेरीस खासगी पुरवठादारांचे दोन तंत्रज्ञ बोलवून गळती थांबविण्यात आली. मात्र तोपर्यंत तात्काळ २२ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यभरात ही घटना चर्चेची ठरली आणि हळहळ तसेच संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकारानंतर राज्य शासनाने तातडीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. तसेच मृतांच्या वारसांना शासनाकडून पाच लाख आणि महापालिकेकडून पाच लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २२ पैकी १६ मृत रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाच्या मदतीचे धनादेश दिले होते. त्यानंतर महापालिका कधी मदत देणार, याविषयी उत्कंठा होती.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दुख:द घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतांच्या वारसांना महापालिकेत न बोलवता घरपोच मदत पोहोचविली आहे. २२ पैकी १६ रुग्णांच्या वारसांबाबत मदत नसल्यानेे संबंधितांना ही मदत देण्यात आली असून, उर्वरित वारसांनादेखील लवकरच मदत देण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
कोट...
दुर्घटनेत बळी गेलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांवर दु:खाचे सावट आहे त्यामुळे त्यांना महापालिकेत बोलवून मदतीचे धनादेश देणे संयुक्तिक वाटले नाही. त्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांनाच घरपोच मदतीची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार त्यांनी मदत देऊन पोच घेतली आहे.
कैलास जाधव, आयुक्त, महापालिका