पाइपलाइन फुटल्याने पाणी वाया

By Admin | Updated: April 20, 2016 00:11 IST2016-04-19T23:46:15+5:302016-04-20T00:11:17+5:30

दुष्काळात तेरावा महिना : जेलरोड येथील अपूर्वा कॉलनी मैदानावर साचले पाण्याचे तळे

Wipe water by filling pipeline | पाइपलाइन फुटल्याने पाणी वाया

पाइपलाइन फुटल्याने पाणी वाया

 नाशिकरोड : जेलरोड शिवाजीनगर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर भूमिगत मोबाइल केबल टाकण्यासाठी ‘हॉरीझोन्टल ड्रील’ मशीनच्या साह्याने काम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन तासांमध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटल्याने शिवरामनगर व आजूबाजूच्या भागात पाण्याचे तळे साचले होते.
जेलरोड इंदिरानगर गांधी पुतळ्यासमोरील श्रीरामनगर येथे वोडाफोन कंपनीच्या मोबाइलची भूमिगत केबल टाकण्यासाठी अत्याधुनिक हॉरीझोन्टल ड्रील मशीनच्या साह्याने सोमवारी दिवसभर काम करण्यात येत होते. लोखंडे यांच्या जागेतून भूमिगत केबल टाकताना शिवरामनगर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर अरूण कोल्हे यांच्या घरालगत रस्त्याच्या कडेने असलेल्या मनपाच्या ३०० एम. एम. व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन त्या अत्याधुनिक मशीनने फोडून टाकली. त्यामुळे पाइपलाइनला आरपार मोठा खड्डा पडला होता.
लाखो लिटर पाण्याची नासाडी
मनपाकडून नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर फुटलेल्या पाइपलाइनमधून फार मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. पाण्याचा आवाज येऊ लागल्याने व पहाटे फिरण्यास गेलेल्या रहिवासी, महिलांच्या सदर बाब लक्षात येताच त्या ठिकाणी गर्दी गोळा झाली. मात्र रहिवाशांकडे पाणी गळती थांबविण्यासाठी किंवा वाचविण्या साठी कुठलीच उपाय योजना नसल्याने प्रारंभी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. पहाटेच्या अंधुक अंधारात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने हलकासा उतार असलेल्या शिवरामनगर, अपूर्वा कॉलनी परिसरात सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोल्हे यांच्या घरासमोर मोकळ्या प्लॉटमध्ये परिसरातील रहिवासी आपली चारचाकी वाहने उभी करतात. त्या वाहनांचे जमिनीपासून ५-६ इंच टायर पाण्यात बुडाले होते.
रहिवाशांनी सदर बाब नगरसेवक शैलेश ढगे यांना कळविताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठ्याचे अधिकाऱ्यांना पाचारण केले. मात्र तोपर्यंत पहाटे साडेपाच वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी आल्यानंतर लागलीच त्या पाइपलाइनचा पाणीपुरवठा बंद केला. मात्र तोपर्यंत पावसाळ्यात साचत नाही इतके पाणी शिवरामनगर भागातील बंगल्याच्या आवारात साचले होते. त्यानंतर लागलीच त्या पाइपलाइनचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन दुपारपर्यंत पूर्ण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Wipe water by filling pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.