प्रभाग समितीत वादळी चर्चा
By Admin | Updated: March 30, 2016 22:52 IST2016-03-30T22:52:11+5:302016-03-30T22:52:34+5:30
नाशिकरोड : अतिक्रमण, डासांचा वाढता प्रादुर्भाव

प्रभाग समितीत वादळी चर्चा
नाशिकरोड : परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, डासांचा वाढता प्रादुर्भाव यावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली.
नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक बुधवारी दुपारी प्रभाग सभापती केशव पोरजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी परिसरात व रस्त्यावर वाढत चाललेले अतिक्रमण यावरून नगरसेवकांनी विभागीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे शिवजयंतीला मिरवणूक मार्ग बदलण्याची पाळी आली होती. असा प्रकार आंबेडकर जयंतीला होऊ नये म्हणून याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
जयंतीच्या वेळी रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या कमानी डीजेमुळे किमान १६ फूट उंचीच्या असाव्यात याबाबत पोलिसांशी पत्रव्यवहार करून बिटकोपासून शिवाजी पुतळा मिरवणूक मार्गावर गर्दी लक्षात घेऊन तात्पुरते जादा हॅलोजन लावण्यात यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. जेलरोड व नाशिकरोड भागात डासांचा वाढता प्रादुर्भाव यावरून मलेरिया विभागाच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम, औषध व धूर फवारणी करण्याची मागणी केली. तसेच तुंबलेल्या गटारी, नाले स्वच्छ करण्यासाठी महिन्याभरापासून तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र भूमिगत गटार विभागाची ‘जेट मशीन गाडी’ नादुरुस्त आहे. यावरूनदेखील नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विषय पत्रिकेवरील विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)